मोत्याप्रमाणे असणारी द्राक्ष कवडीमोल भावात
अमोल मतकर दोन एकरासाठी साडेचार लाख खर्च; 18 टन द्राक्षे

संगमनेर – करोना विषाणू संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला आहे.त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाल्याचे दिसू लागले आहे. परिसरात परिपक्व झालेल्या द्राक्षे बागा कोरोना संसर्गाचा परिणाम व अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानाचा विपरित परिणाम अशा दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्षे उत्पादित शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष घालावे अशी मागणी द्राक्षे उत्पादक करत आहे.
संगमनेर तालुक्यातील राजापूर गावातील बादशहा सावळेराम हासे यांनी निर्यातक्षम द्राक्षांचे दोन एकरात उत्पादन घेतले. मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडला त्यानंतर जगभरासह महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्ग रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे व्यापारी त्यांच्या शेतीकडे डोकूनही पाहायला आले नाही. निर्यातक्षम द्राक्षांसाठी तब्बल साडेचार लाख रुपये खर्च करून मोत्याप्रमाणे असणारे द्राक्षे आता कवडीमोल भावात विकत आहेत. जर कोणी त्यांच्या शेतीवर द्राक्षे आणण्यासाठी गेले तर 100 रुपयात तीन किलो द्राक्षे ते देतात. त्यामुळे त्यांचा खर्चही निघणार नसल्याचे हासे यांनी सांगितले.
या द्राक्षबागेकडून त्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या मात्र, त्या सर्व अपेक्षा करोनामुळे धुळीस मिळाल्या आहेत. यावर्षी बागेवर झालेला खर्चही निघणार नसल्याने कुटुंब कर्जबाजरी होणार असल्याने ते म्हटले. कुटुंबियांच्या तोंडातला घास कमी करून या बागेसाठी औषधे, मशागतीसाठी खर्च केला. परंतु हासे कुटुंबियांची संपूर्णपणे भ्रमनिराशा झालेली आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने बाजारपेठेत शांतता झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली तरकारीची पिके सोडून दिली आहेत. त्याचबरोबर अधूनमधून निर्माण होणारे ढगाळ हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल होत आहे. त्याचा जास्तीत जास्त विपरित परिणाम परिसरातील द्राक्ष बागांवर होत आहे. सद्यस्थितीत द्राक्षे बागा माल तोडणीच्या अवस्थेत असल्यातरी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची वाणवा, वाहतूक व्यवस्थेचे संकट, व्यापारी वर्गाची माल खरेदीची अनास्था व प्रतिकूल वातावरण यामुळे बागेत असलेला माल विकला जाऊन अपेक्षित आर्थिक मिळकत होणार का याबाबत शेतकरी वर्गामध्ये साशंकता आहे.
सर्वच निविष्ठांच्या वाढत्या खर्चामुळे द्राक्षे बागांचा उत्पादन खर्च वाढत आहे. सद्यस्थितीत माल काढणीच्या अवस्थेत असून करोना व प्रतिकूल हवामान याचा विचार करून संबंधित प्रशासनाने द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे
बादशहा हास, राजापूर, द्राक्ष उत्पादक शेतकरी





