koynanagar: …अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्राचा मार्ग मोकळा!
koynanagar या प्रकल्पामुळे कोयनानगरच्या बांधकाम, वाहतूक, निवास आणि अन्य पूरक सेवांशी संबंधित आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्याची शक्यता आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच परिसराच्या विकासाला हातभार लागू शकतो. शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे सरकलेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

koynanagar: कोयनेच्या कुशीत वसलेल्या कोयनानगरच्या विकासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालयाच्या प्रकल्पाने आता पुढचे पाऊल टाकले आहे. शासनाची मान्यता मिळूनही तीन वर्षे प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामासाठी 2026 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोयनानगरच्या विकासाचा हा महत्त्वाचा विषय पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.
या प्रकल्पासाठी गोकुळ तर्फ हेळवाक येथील 38.93 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी शासनाने या प्रकल्पासंदर्भात मान्यता दिल्यानंतर परिसरात विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, मंजुरीनंतर प्रत्यक्ष बांधकामाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी बराच कालावधी गेल्याने हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार, याबाबत उत्सुकता कायम होती. आता बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पुढे आल्याने या प्रतीक्षेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होणे आणि प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणे या स्वतंत्र बाबी असल्याने आता प्रशासनाकडून पुढील कार्यवाही किती वेगाने होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रस्तावित एसडीआरएफ मुख्यालयामुळे आपत्तीच्या काळात बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होऊ शकते. कोयना परिसराचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, या केंद्राचे महत्त्व केवळ पाटण तालुका किंवा सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित राहणार नाही. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये उद्भवणार्या आपत्तींच्या वेळी या केंद्राची भूमिका उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे हा प्रकल्प सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या प्रकल्पामुळे कोयनानगरच्या बांधकाम, वाहतूक, निवास आणि अन्य पूरक सेवांशी संबंधित आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्याची शक्यता आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच परिसराच्या विकासाला हातभार लागू शकतो. शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे सरकलेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सोनारखडी परिसराला येणार सोन्याचे दिवस!
गोकुळ तर्फ हेळवाक येथील सोनारखडी परिसरात पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि आपत्कालीन व्यवस्था केंद्राची उभारणी होत आहे. याच परिसरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हेळवाक येथे कोयना नदीवर बोटिंग व नौकाविहार केंद्र विकसित होत आहे. एकाच भागात साकारत असलेल्या या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे सोनारखडी-हेळवाक परिसराचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात सोनारखडी-हेळवाक परिसराला खर्या अर्थाने ‘सोन्याचे दिवस’ येण्याची आशा निर्माण झाली आहे.





