काटेवाडीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत

काटेवाडी : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी (ता.बारामती) येथे दुपारी सव्वा बारा वाजता आली असता गावच्या वेशी वरती शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार व विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोठ्या भक्ती भावाने पालखीचे स्वागत केले. पालखी कमानीमध्ये आली असता धोतरांच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत करण्यात आले.
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती वरून निघाल्यानंतर मोतीबाग, बांदलवाडी, पिंपळी, लिमटेक या मार्गावरून काटेवाडी या ठिकाणी आला. यावेळी पालखीच्या रथामधून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका खांद्यावरती घेऊन त्याच बरोबर कमानी पासून ते विसाव्याच्या ठिकाणी पालखी ओटा या ठिकाणी नेण्यात आले. परंपरेप्रमाणे मान असणाऱ्या परीट समाजाच्या बाळासाहेब ननवरे, दत्तात्रय ननवरे, राजेंद्र ननवरे, संतोष ननवरे, राहुल ननवरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी धोतराच्या पायघड्या घालत पालखी ओटा या ठिकाणी पालखी आणण्यात आली.
यावेळी श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अनिल काटे, उपसरपंच मिलिंद काटे, माजी सरपंच विद्याधर काटे, माजी उपसरपंच श्रीधर घुले, राजेंद्र पवार, अजित काटे, जितेंद्र काटे, प्रकाश काटे, ह. भ. प. सुनील काटे, अमर जगताप यांनी खांद्यावरती पालखी घेऊन पालखी ओटा या ठिकाणी मोठ्या उत्साहमध्ये पालखी आणली.
दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत पालखी ओटा याठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक येत असतात. त्यामुळे पालखी ओटा या ठिकाणी महिला व पुरुषांचे दर्शन रांगेत घेण्यासाठी योग्य प्रकारे सोय करण्यात आली असून सर्व भाविकांना दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी योग्य प्रकारे बंदोबस्त ठेवला आहे.





