‘शिवजयंती’ साजरी करण्याचा मूळ उद्देश शिवरायांचे विचार अंगीकारणे ; राजेंद्र शिनारे यांचे प्रतिपादन

पुणे : स्वानंद प्राथमिक विद्यालयात ‘ शिवजयंती ‘ जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते व निवेदक श्री. राजेंद्र शिनारे, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, दादासाहेब मनोरे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विलास नऱ्हे, सचिव संतोष पवार, मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, शिक्षक प्रतिनिधी वंदना कदम, पालक शिक्षक संघाच्या सदस्या दामिनी कसबे, रेणुका तायनाथ, नंदा धोत्रे यांच्या उपस्थितीत बाल शिवबा, माता जिजाऊ, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांचे ढोलताशाच्या गजरात व शिवगर्जनेने भव्य आगमन झाले.
या कार्यक्रमात वार्षिक क्रीडा स्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धामध्ये प्रविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांचा प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पाळणा, शिवगीते, पोवाडा, गायन व नृत्य असे विविध कलागुण सादर केले. यात पालकांनीही सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते राजेंद्र शिनारे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची धर्माप्रती असणारी निष्ठा व प्रेम कसे होते याची माहिती दिली. तसेच, शिवजयंती साजरी करण्याचा मूळ उद्देश म्हणजे शिवरायांचे विचार आपल्या अंगी आणणे, आचरणात आणणे हा आहे हे स्पष्ट केले.
आजच्या मातांनी आपल्या मुलांना माता जिजाऊने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणेच शिकवावे व मुलांना शिवचरित्र वाचायला सांगावे अशी माहिती दिली. त्यांच्या व्याख्यानाने विद्यालयाचा परिसर दणाणला. पालक, विद्यार्थी, शिक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सहशिक्षिका दीपाली बिबवे यांनी केले.





