Madhuri dixit : माधुरी दीक्षित म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येण्याची संधी..! ‘कोण होणार करोडपती’ कारण्यामागं अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण
आता त्या ‘कोण होणार करोडपती’च्या आठव्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. त्यामुळे अभिनयाच्या पलीकडे त्यांचे सहज, उत्स्फूर्त आणि संवादात्मक व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Madhuri dixit : मराठीतील लोकप्रिय प्रश्नमंजूषा कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ आपल्या आठव्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या पर्वाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित स्वीकारणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच माधुरीला अभिनयाव्यतिरिक्त एका वेगळ्या भूमिकेतून मराठी प्रेक्षकांशी थेट संवाद साधताना पाहायला मिळणार आहे.
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाची सुरुवात २०१३ मध्ये ईटीव्ही मराठीवर झाली. पहिल्या पर्वापासून अभिनेते सचिन खेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर अभिनेता स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही वेगवेगळ्या पर्वांची सूत्रे सांभाळली. आता आठव्या पर्वासाठी सोनी मराठीने माधुरी दीक्षितची निवड करत प्रेक्षकांना खास सरप्राइज दिले आहे.
दरम्यान, विषयी बोलताना माधुरीने सांगितले की, चित्रपटांमध्ये काम करताना कलाकार नेहमी एखाद्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांसमोर येतो. मात्र, ‘कोण होणार करोडपती’मध्ये ती कोणतीही व्यक्तिरेखा साकारणार नसून ‘माधुरी दीक्षित’ म्हणूनच स्पर्धक आणि प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व, उत्स्फूर्तपणा आणि अभिनयापलीकडची बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या कार्यक्रमाला केवळ प्रश्नोत्तरांचा खेळ न मानता प्रत्येक स्पर्धकाची कथा जाणून घेण्याची संधी म्हणून माधुरी पाहते. स्पर्धकांच्या आयुष्यातील अनुभव, भावनिक क्षण, हास्याचे प्रसंग आणि अनपेक्षित घडामोडींमधून कार्यक्रमाचे वातावरण अधिक नैसर्गिक आणि जिवंत होईल, असे तिने म्हटले आहे.
विशेष म्हणजे माधुरीने यापूर्वी २००२ मध्ये सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कही ना कही कोई है’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. तब्बल २४ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या आठव्या पर्वासाठी नोंदणी सुरू झाली असून हा कार्यक्रम लवकरच सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
माधुरी दीक्षित यांच्याबद्दल थोडक्यात…
माधुरी दीक्षित या हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहेत. ‘तेजाब’, ‘दिल’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन..!’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘देवदास’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची आणि नृत्यकौशल्याची वेगळी छाप पाडली. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून, त्या पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी आहेत.
अभिनयासोबतच माधुरी दीक्षित यांनी दूरचित्रवाणीवरील विविध रिअॅलिटी आणि मनोरंजन कार्यक्रमांमध्ये परीक्षक व सूत्रसंचालक म्हणूनही काम केले आहे. आता त्या ‘कोण होणार करोडपती’च्या आठव्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. त्यामुळे अभिनयाच्या पलीकडे त्यांचे सहज, उत्स्फूर्त आणि संवादात्मक व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.






