‘एव्हिएशन गॅलरी’च्या उद्घाटनाला मुहूर्तच सापडेना

ठेवा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत : मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्यामुळे लोकार्पणच नाही
पुणे – महापालिकेला देशातील पहिल्या “एव्हिएशन गॅलरी’च्या उद्घाटनाला मुहूर्तच मिळत नसल्याने हा ठेवा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत तसाच बंद ठेवला आहे. शिवाजीनगरच्या महापालिकेच्या शाळेत आकाराला आलेल्या या गॅलरीमध्ये विमानाच्या इतिहासापासून आजच्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतची सर्व माहिती मॉडेल्ससह उपलब्ध करून दिली आहे. परंतु, ती अजूनही कुलूपबंदच आहे.
या गॅलरीचे काम लोकसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु, निवडणुकीच्या आचारसंहिता आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची उद्घाटनासाठीची वेळ न मिळाल्यामुळे ती लोकार्पण होऊच शकली नाही. मात्र, आता दोन्ही निवडणुकांचे निकालही लागले, सरकारही स्थापन झाले परंतु या गॅलरीच्या उद्घाटनाला मुहूर्तच मिळेना असे एकंदरीत चित्र आहे. या चार मजली गॅलरीमध्ये जगभरातील लढाऊ विमाने, हवाई परिवहन आणि रोजगाराच्या संधींचीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात विमान उडवण्याचा अनुभव सिम्युलेटरच्या सहाय्याने घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राईट बंधूंनी विकसीत केलेले विमान, 1783 मध्ये निर्माण करण्यात आलेले हॉट एअर बलून, विज्ञानातील प्रसिद्ध असा बरनॉली सिद्धांत, न्यूटनने मांडलेला तिसरा सिद्धांत भारतीय हवाई उड्डाणाचे जनक जेआरडी टाटा, पंडीत शिवकर बापूजी तळपदे यांच्याबद्दलची आणि त्यांच्या विमानांबद्दलची रोचक माहिती याठिकाणी मिळणार आहे.
गॅलरी माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरणार
एरोफाईल आणि त्याचे प्रकार, विमानाचे विविध प्रकारचे पंख, विमान नियंत्रित करणारे भाग, विमानावर कार्य करणारी बले, उड्डाणांमागील विज्ञान आणि विमानांचा एकंदर इतिहास, हवाई परिवहन आणि विमान क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, विमानतळ कशाला म्हणतात, धावपट्टी काय असते, जगातील लांब धावपट्टी कुठे आहे यासह हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नेमके विज्ञान काय आहे, हे सचित्र मांडण्यात आले आहे. लहान मुलांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांसाठीच ही गॅलरी माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे.
देशातील पहिल्या एव्हिएशन गॅलरीचे काम अत्यंत देखणे झाले आहे. सर्वांना याठिकाणी विमान, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने आदींबद्दलची सर्व माहिती मिळणार आहे. निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने उद्घाटन घेता आले नव्हते. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच या गॅलरीचे उद्घाटन होईल आणि ही एव्हिएशन गॅलरी नागरिकांसाठी खुली होईल.
– ज्योत्स्ना एकबोटे, स्थानिक नगरसेविका





