एक मिनिटच्या टीझरने उत्कंठा प्रचंड वाढली; कांतारा अन् दशावताराच्या तोडीस तोड ‘गोंधळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

gondhal movie trailer : साऊथ सिनेमा इंडस्ट्रीत तयार झालेला कांतारा चॅप्टर १ सिनेमा देशभरातील चित्रपटगृहांवर धूमाकूळ घालत आहे. दसरा सणाच्या आदल्या दिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत चारशे कोटींचा भरगच्च गल्ला गोळा केला असून लवकरच कांतारा चॅप्टर १ पाचशे कोटीच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
या सिनेमातील मुख्य गाभा हा त्या ठिकाणीची संस्कृती आहे. याच संस्कृतीवर तयार करण्यात आलेल्या कथेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण केले. आता या सिनेमांसारखा प्रयोग प्रादेशिक भाषिक सिनेमांमध्ये होताना दिसत आहे.
नुकताच मराठीतील कांतारा अशी उपाधी मिळवलेल्या दशावतार सिनेमाने एक सुंदर चित्रण तयार करून भन्नाट सिनेमॅटिक अनुभव मराठी सिनेरसिकांना दिला. दशावताराने बॅाक्स अॅाफिसवर रेकॅार्डब्रेक कमाई केली. दशावतार सिनेमात दाखविण्यात आलेले कोकण याअगोदर कोणत्याच सिनेमात इतक्या आतून दाखवण्यात आलेले नव्हते.
आता या दोन्ही सिनेमांच्या तोडीस तोड एक नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. गोंधळ सिनेमाच्या अवघ्या एका मिनिटांच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. टीझरमधूनच सिनेमाचे स्किल किती मोठे आहे याचा अंदाज येतो. मराठीत नवनवे प्रयोग हाताळून सिनेमे तयार केले जात आहेत. याचे उत्तम उदाहण म्हणजे गोंधळ या सिनेमाचा टीझर आहे.
नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून सिनेमाची कथा तयार करण्यात आली आहे. या सिनेमाचे लेखन दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. या सिनेमात अभिनेते किशोर कदम हे महत्वाची भूमिका साकारत आहेत. तर १४ नोव्हेंबरला गोंधळ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : “माझा मानसिक आणि शारीरिक छळ झाला”; मयुरी वाघचा घटस्फोटानंतर मोठा खुलासा





