सावधान…धोका वाढतोय! देशात करोनाग्रस्तांच्या संख्येने ओलांडला 34 लाखांचा टप्पा

नवी दिल्ली, दि. 29 – देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येने 34 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काल एका दिवसात देशात करोनाचे 76 हजार 472 रुग्ण आढळून आले. तथापि करोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 26 लाख 48 हजार 998 इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 76.47 टक्के इतका झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
या मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार करोनाग्रस्तांची देशातील संख्या 34 लाख 63 हजार 972 इतकी झाली आहे. या रुग्णांमध्ये मृत्यूचे सध्याचे प्रमाण 1.81 टक्के इतके आहे.
देशात सध्या करोनाच्या ऍक्टिव्ह केसेस 7 लाख 52 हजार 424 इतक्या आहेत. देशातील करोनाग्रस्तांची गेल्या पंधरा दिवसांची आकडेवारी लक्षात घेतली तर 7 ऑगस्ट रोजी करोना रुग्णांचा 20 लाख इतका असलेला आकडा 23 ऑगस्ट रोजी 30 लाख इतका झाला होता.
म्हणजेच केवळ 16 दिवसांत देशांत करोनाचे रुग्ण 10 लाखांनी वाढले आहेत. अजूनही रुग्णांचे प्रमाण वाढतच असल्याने ती एक चिंतेची बाब बनली आहे.





