पुढचा मुख्यमंत्री ‘या’ पक्षाचा होईल…; नाना पटोलेंचं मोठं विधान, इतर पक्षांची डोकेदुखी वाढणार

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्राचं आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान, हे सर्व सुरु असतानाच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि. 1) पत्रकार परिषद घेत काही महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. “मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय जनताच करेल. ज्या पक्षाला जनता आशिर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल..’ असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांची डोकेदुखी वाढू शकते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पत्रकार परिषदेत त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, “राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असली तरी त्यावर आता भाष्य कण्याची गरज वाटत नाही. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, ते प्रश्न हाती घेऊन कॉंग्रेस जनतेला न्याय देण्यासाठी लढत आहे.
सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, जे लोक त्यावर चर्चा करत असतील तर त्यांना करु दया. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय जनताच करेल. ज्या पक्षाला जनता आशिर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.’ असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यतील अनेक महत्वाच्या मुद्यांवर हात घालत आपलं मत व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले की, ‘राज्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच नंबर एकचा पक्ष म्हणून विजयी झालेला आहे. जनतेचा विश्वास कॉंग्रेस पक्षावर आणखी दृढ झालेला आहे. भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडाला आहे, असेही नाना पटोले म्हणाले. यावेळी राज्याच्या विकासावरून नाना पटोलेंनी भाजपावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं.





