पुणे | विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल रविवारी (दि. १४) सुरू झाले. येथून दिल्लीसाठी पहिले एअर इंडियाचे उड्डाण (फ्लाइट क्रमांक एआय-858) झाले. यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते टर्मिनलवरील पहिल्या प्रवाशी लेफ्टनंट कर्नल मनिषा डबास यांना बोर्डिंग पास देण्यात आले.
या वेळी खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी, महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले, विमानतळ संचालक संतोष ढोके यासह केंद्रीय सुरक्षा बलाचे अधिकारी, विमान कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसचे पुण्याहून भुवनेश्वरसाठी दुसरे उड्डाण (फ्लाइट क्रमांक आय 5-320) झाले. त्या विमानाच्या प्रवाशांना देखील मोहोळ यांच्या हस्ते बोर्डींग पास देण्यात आला. यावेळी लेफ्टनंट कर्नल मनिषा डबास म्हणाल्या, नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांची मोठी सुविधा होणार आहे. या विकसित टर्मिनलमधून पहिला प्रवासी म्हणून प्रवास करताना अतिशय आनंद होत आहे.
नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आज हे टर्मिनल प्रवाशांसाठी खुले झाले असून, महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेले नवीन टर्मिनल पाहिल्यावर प्रवासी नक्कीच आनंदी होतील. या नव्या टर्मिनलमुळे वर्षाला सुमारे एक कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक करणे शक्य होणार आहे. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी हवाई वाहतूक





