पिंपरी | नवीन वीज जोडणी प्रक्रिया होणार पेपरलेस!

पिंपरी, (प्रतिनिधी) – कागदोपत्री नवीन वीज जोडणी प्रक्रिया ऑनलाईन दिसत असली तरीही त्यात नवीन अर्जदाराला अनेक कागदपत्रे आणि प्रक्रिया ऑफलाईन करायला सांगण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने महावितरण अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना याबाबतच्या वास्तविक परिस्थितीशी अवगत करून दिल्यानंतर महावितरणने याची दखल घेत पेपरलेस कारभार करण्यासाठी नव्याने आदेश काढले आहेत.
प्रक्रिया राबवताना ग्राहक प्रतिनिधी म्हणून असोसिएशनकडून महावितरण प्रशासनाला काही सूचना करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती असोसिएशनने दिली आहे.
बहुतांशी सर्वच शासकीय आस्थापनांकडून ऑनलाईन पद्धतीने सुविधा पुरविल्या जात असताना, महावितरण नवीन वीज जोडणीसाठी आजही कागदपत्रे कार्यालयात जमा करायला सांगणे, नवीन वीज जोडणीच्या फाईल एका कार्यालयातून दुसर्या कार्यालयात फिरविणे, टपाल आवक – जावक क्रमांक असे अनेक प्रकार अद्यापही सुरू आहेत.
या बाबी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने महावितरण मुख्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आणि याबाबत पुण्याचे मुख्य अभियंता यांनी पुणे जिल्ह्यात तातडीने पेपरलेस कारभार होईल यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे.
महावितरणने पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनकडून प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना मागितल्या होत्या. त्याबाबत फीडबॅक घ्यायला बैठक आयोजित केली होती.
त्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया पेपरलेस करण्यासाठी सद्यस्थितीत जाचक ठरत असलेल्या काही बाबी वगळून,एका कार्यालयातून दुसर्या कार्यालयात फाईल घेऊन न जाता, 100 टक्के ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याबाबत काही बाबी सुचविण्यात आल्या.
भोसरी येथे पार पडलेल्या या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता गायकवाड,कार्यकारी अभियंता मुरकुटे,मुंडे तसेच अन्य सर्व अधिकारी उपस्थित होते.
असोसिएशनकडून अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर,उपाध्यक्ष मनोज हरपळे, जावेद मुजावर, सचिव नितीन बोंडे, मंगेश सोनकांबळे, मनोज सचदेव, नटराज बोबडे, दिलीप कदम व संजय मोरे हे उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने सुचविलेले बदल
-वीज जोडणी मंजुरी प्राधिकृत अधिकार्याच्या कार्यालयात केवळ एक मास्टर फाईल जमा करणे.
– संपूर्ण प्रक्रियेत ईमेल द्वारेच एका कार्यालयातून दुसर्या कार्यालयात कागदपत्रांची देवाणघेवाण करणे.
– टपाल आवक जावकसाठी अडवणूक थांबविणे.शक्य असेल तर सॅप यंत्रणेद्वारे नवीन वीज जोडण्या देणे.
– शाखा कार्यालयात वीज मीटरचा पुरेपूर साठा ठेऊन जोडण्या सुलभ करणे





