खासगी विद्यापीठांच्या संख्येवर अंकुश लावण्याची गरज – डॉ. अभय जेरे

पुणे – राज्यांमध्ये खासगी विद्यापीठांची संख्या वाढत असून, त्याद्वारे मोठ्या संख्येने पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. या प्रकारावर कुठेतरी अंकुश लावण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे ( एआयसीटीई) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुढील २५ वर्षांतील शिक्षण व्यवस्था या विषयावर डॉ. जेरे बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, खजिनदार अंजली खमितकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे कार्यवाह गजेंद्र बडे उपस्थित होते. याप्रसंगी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा, संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. जेरे म्हणाले, देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी २०३० पर्यंतचा कालावधी लागेल. या धोरणामुळे शैक्षणिक पद्धतीत बदल होतील. तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. या बदलांसाठी तंत्रज्ञानाने युक्त नव्या शिक्षण संस्था निर्माण होतील. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण संस्थांना बदलावे लागेल. तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर, कुशल मनुष्यबळ अशा सर्व बाजूंनी विचार करणारी शिक्षणसंस्था टिकतील.
ग्रामीण भागातील विद्यार्थींही गुणवंत
आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांइतक्याच ग्रामीण भागातील आणि लहान शहरातील विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकडून भन्नाट आणि नावीन्यपूर्ण कल्पना पुढे येत आहेत. त्यांच्याकडून यशस्वी स्टार्टअपची निर्मिती होत आहे. चांद्रयान मोहिमेत याच विद्यार्थ्यांनी भूमिका बजावली आहे. नेचर जर्नलमध्येही भारतातील विज्ञान क्षेत्रातील प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला असून, त्यामध्ये लहान शहरे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे, याकडे डाॅ. जेरे यांनी लक्ष वेधले.
कौशल्य शिक्षण आवश्यकच
आरोग्यशास्त्रातील प्रगती आणि संशोधनामुळे आताच्या पिढीचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे ही पिढी अधिक काळ काम करू शकणार आहे. त्याचवेळी नोकऱ्यांचे स्वरूपही बदलणार आहे. वेळोवेळी आवश्यक कौशल्याचे शिक्षण घ्यावे लागेल. केवळ एकदा शिक्षण घेतले आणि झाले, ही संकल्पना संपुष्टात येईल. मल्टिटास्किंग पद्धतीने काम करण्यासाठी ठराविक काळाने, शिक्षण घ्यावे लागणार असल्याचे डॉ. जेरे यांनी सांगितले.





