Dharmendra Pradhan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा दूरदर्शी संकल्प मांडला आहे. आजच्या जागतिक आर्थिक परिदृश्यात भारत एक उज्ज्वल केंद्रबिंदू म्हणून उभा आहे. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम व अंमलबजावणीसाठी व्यापक संधी उपलब्ध करून देत आहे. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची सशक्त ज्ञानव्यवस्था, लोकसंख्येचा लाभ आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि स्टडी इन इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांसाठी जागतिक संधींचे नवे मार्ग खुले करत आहोत, असे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले. येथे स्टडी इन इंडिया एज्यु-डिप्लोमॅटिक कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आले आहे. Dharmendra Pradhan या कनक्लेव्हमध्ये प्रधान यांनी 50 हून अधिक देशांतील मान्यवर, उच्चायुक्त आणि राजनैतिक प्रतिनिधींना संबोधित केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या प्रेरणेने भारतीय शिक्षण व्यवस्थेत घडत असलेल्या आमूलाग्र परिवर्तनाबाबत, शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने घेतल्या जात असलेल्या भव्य झेपांविषयी, तसेच गुणवत्तेला, नवोपक्रमांना आणि परवडणाऱ्या शिक्षणाला भारत देत असलेल्या प्राधान्याविषयी त्यांनी त्यांचे विचार मांडले.