पुणे | रेल्वे प्रशासनापुढे महापालिका हतबल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग ( जाहिरात फलक) सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर कोसळला होता. त्यात चौघांचा जीव गेला होता. ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली. आता याच ठिकाणी रेल्वेकडून उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
“हे जाहिरात फलक आमच्या हद्दीत आहेत, पालिकेने त्याची तपासणी करू नये. तसेच ते पालिकेच्या नियमावलीपेक्षा मोठे असल्याने ते पालिकेस काढू देण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला आहे. तर, महापालिकेनेही “या प्रकरणी केवळ आम्ही परवाना देऊन शुल्क घेणार. मात्र, दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी रेल्वेची असेल,’ असे सांगत नियमांचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे दोन विभागांच्या वादात पुणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे.
आरटीओ कार्यालय ते अमर शेख चौकापर्यंत रस्त्याकडेने रेल्वेच्या हद्दीत तब्बल अर्धा डझन जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. हे बेकायदेशीर असल्याची नोटीस महापालिकेने रेल्वे प्रशासनास दिली होती.
मात्र, हे रेल्वेच्या हद्दीत असून महापालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगत पालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यानंतर आता रेल्वेच्या या मोठ्या जाहिरात फलकांबाबत तक्रारी येत असतानाच महापालिकेने यात काहीच करता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
आमचा परवाना घ्यावा : मनपा आयुक्त
याबाबत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले, “आकाशचिन्ह परवाना नियमावलीनुसार रेल्वेच्या हद्दीत जाहिरात फलक असला, तरी त्याचा दर्शनिय भाग सार्वजनिक रस्त्यावर आहे. त्यामुळे रेल्वेला परवाना घेण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत.
तसेच स्ट्रक्चरल आॅडिटही मागितले होते. मात्र, जाहिरात फलक रेल्वेच्या हद्दीत असल्याने महापालिकेस त्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, काही दुर्घटना घडल्यास त्याला रेल्वे जबाबदार राहिल.’
शहरातील होर्डिंग्जवर कारवाई
१६ मे – ८
१७ मे -२०
१८ मे – ९
२० मे – १६





