Rahul Gandhi : ‘वर्षभरात मोदी सरकार पडणार’; राहुल गांधींचा मोठा दावा, ‘हा’ इशारा देत म्हणाले…
Rahul Gandhi : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांचा परिणाम भारतावर होत असल्याचे सांगत त्यांनी इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा उल्लेख केला.

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक परिषद 2026 मध्ये केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर जोरदार टीका केली. या परिषदेत त्यांनी आदिवासी हक्क, देशाची आर्थिक स्थिती आणि केंद्रातील सत्ताधारी नेतृत्वावर भाष्य करत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
परिषदेत बिरसा मुंडा यांना अभिवादन केल्यानंतर राहुल गांधी यांनी आदिवासी आणि वनवासी या संज्ञांमधील फरक स्पष्ट केला. आदिवासी समाज हा भारताच्या संस्कृती आणि इतिहासाचा मूळ आधार असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि RSSवर जोरदार निशाणा साधत आदिवासींना त्यांच्या जल, जंगल आणि जमीन हक्कांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी काँग्रेस प्रत्येक स्तरावर संघर्ष करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी दिला इशारा
देशाच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी आगामी काळात गंभीर आर्थिक संकट भेडसावणार असल्याचा इशारा दिला. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांचा परिणाम भारतावर होत असल्याचे सांगत त्यांनी इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा उल्लेख केला. “देशाकडे मोठी आर्थिक त्सुनामी येत आहे. वस्तूंच्या किमती वाढतील आणि देशाला अशा आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, जे यापूर्वी कधीच पाहिले नसेल,” असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा : Lovkesh Bajaj : दिल्लीतील भीषण हॉटेल आग प्रकरणात नवा ट्विस्ट; मालकाची धक्कादायक कबुली
राहुल गांधी यांचा मोठा दावा
तसेच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि गुप्तचर यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत राहुल गांधी यांनी दावा केला की, जनतेचा दबाव वाढल्यास आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तसेच, “माझ्या मते नरेंद्र मोदी पुढील एका वर्षात पंतप्रधान राहणार नाहीत,” असे विधान राहुल गांधींनी केलेल्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वातावरण तापले असून, त्यांच्या दाव्यांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






