मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता ज्या ठिकाणी बोगस मतदार दिसेल त्याला आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई न करता निवडणुका घोषित झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संदीप देशपांडे म्हणाले, आज निवडणुका, उद्या निवडणुका, चार महिने पुढे असे सुरू असताना अखेर निवडणुका जाहीर झाल्या ही आनंदाची बाब आहे. साडे तीन वर्षे झाली, आद गंगेत घोडे न्हाले. पण मतदार यादीत जो घोळ होता तो सोडवण्याच्या आधी, त्याच घोळ असलेल्या मतदार याद्या घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. एक निश्चित सांगतो, जिथे आम्हाला बोगस मतदार आढळला, तिथे आम्ही त्याला काय ट्रिटमेंट द्यायची हे राज साहेबांनी सांगितले आहे. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांनी बोगस मतदारांवरुन निवडणूक आयोगा धारेवर धरले होते. मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा देखील निघाला होता. राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसमोर झालेल्या जाहीरसभेत बोगस मतदारांचे गठ्ठेच सादर केले होते.