Satara | रोजगार देणारा बहुजनांचा मसिहा हरपला

सातारा, (प्रतिनिधी ) – भारतीयत्व जपणारा, व्यापारापेक्षा उदयोगाची मती असणारा, जागतिक उदयोग क्षेत्राला आपल्याजीवन कार्यकर्तुत्वाने नेहमीच एका उंचीवर नेणारे, एक असामान्य व्यक्तीमत्व लाभलेल्या रतन टाटा यांना आज काळाने आपल्या उदरात सामावून घेतले याचे अतिव दु:ख आहे, या शब्दात खासदार उदयनराजे यांनी आपला शोक व्यक्त केला.
टाटा उद्योग समूहाचे प्रमुख आधारस्तंभ रतनजी टाटा यांचे मुंबई येथे गुरूवारी निधन झाले. राज्य शासनाने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी रतन टाटा यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
जल मंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटले आहे की, काळ कोणासाठी थांबत नाही हे जरी खरे असले तरी मा. रतनजी टाटा यांच्या जाण्याने समस्त भारतीयांना ज्या वेदना होत आहे.
त्या व्यक्त करण्यासाठी निश्चितच शब्द नाहीत. आपले उत्पन्न समाजासाठी उपयोगात आणणारा असा अवलिया पुन्हा होणार नाही. रतनटाटा यांच्या जाण्याने भारतीय उदयोग आणि सामाजिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरुन येणारी आहे. त्यांच्या जाण्याने आमच्यासह समस्त भारतीयांचा आधारवड हरपला.





