“सामना फिक्स होता.., पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

IND vs PAK | Sanjay Raut : नुकताच दुबईमध्ये भारत पाकिस्तान सामना झाला असून भारताने या सामन्यात विजय मिळवलाय. मात्र, भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, अशी लोकांची भावना बघायला मिळाली. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. फक्त हल्लाच नाही तर थेट धर्म विचारून लोकांवर गोळ्या झाडल्या.
पहलगाम हल्ल्याच्या काही महिन्यांनंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी लोकांची भावना होती. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाने राज्यभर आंदोलने केली.
अशातच आता, खासदार संजय राऊत यांनी या सामन्याबाबत एक मोठा दावा केला आहे. हा सामना पूर्णपणे फिक्स होता आणि यातून पाकिस्तानला 50,000 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे राऊतांचे म्हणने आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी हे विधान केलं आहे.
यावेळी ते म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणे ही सरकारची निर्लज्जता आहे. दुबई, अबूधाबी किंवा कुठल्याही मैदानावर सामना झाला असो…भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, हा आपल्या शूर सैनिकांचा, शहीदांचा आणि महिलांचा अपमान आहे. सामना खेळून सिंदूर परत येणार आहे का?’’ असा सवाल त्यांनी यावेळी केला.
राऊत पुढे म्हणतात, “हा सामना फिक्स होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले. सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा सट्टा लागला होता, त्यातील 50 हजार कोटी पाकिस्तानात गेले. एकीकडे केंद्र सरकार आयएमएफ आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेला सांगते की, पाकिस्तानला कर्ज देऊ नका, ते पैसे दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जातील.
पण काल भारताच्या मदतीने पाकिस्तानला मिळालेल्या पैशांचे काय? अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांनी पाकिस्तानला हे पैसे दिले. हे पैसे दहशतवादासाठीच वापरले जाणार आहेत. पाकिस्तानला त्यांच्या दहशतवादाला ‘बळकट’ करण्यासाठी निधी देण्याची त्यांची रणनीती आहे, जेणेकरुन ते आपल्यावर हल्ला करतील आणि याचा त्यांनाच राजकीय फायदा मिळेल,’’ असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी केला.
कसा रंगला भारत-पाकिस्तान सामना :
आशिया कप २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पाडला. या सामन्यात भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ विकेट्सनी पराभव करत स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून भारतासमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने ३ गडी गमावून सामना जिंकला. यासह भारतीय संघ सुपर-४ मध्ये दाखल झाला.





