पिंपरी | दिवाळीच्या पणत्यांनी सजली बाजारपेठ

कान्हे, (वार्ताहर) – दिवाळीच्या सणाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीत घरोघरी लावण्यात येणाऱ्या पणत्या तसेच इतर साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीसाठी फक्त चारच दिवस बाकी असल्याने नागरिकांची लगबग सुरु झाली आहे.
नवरात्रोत्सव आणि दसरा सण झाल्यानंतर सर्वांनाच दिवाळीचे वेध लागतात. बच्चे कंपनीपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच दिवाळी सण आवडतो. या सणाची तयारी देखील कित्येक दिवस आधी सुरु होते.
घराची स्वच्छता, रंगकाम इथपासून ते दिवाळीत देवी लक्ष्मीचे आगमन होणार असल्याने आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या इत्यादी वस्तू घरात आणण्याची घाई असते. यावर्षी शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे.
लक्ष्मीची पाऊले, गोल्डन रांगोळी, स्टिकर्स रांगोळी, डिझाइन पट्टया, शुभ-लाभ स्टिकर्स, गाय-वासरू, मोर, गणपती बाप्पा, स्वस्तिक, नारळाचे शुभ-लाभ आदी साहित्य बाजारात दाखल झाले आहे. सौभाग्यवतींसाठी हळदी-कुंकवाची पावले, पणत्या स्टॅण्ड, रंगीत पणत्या, मोठ्या पणत्या, बत्तासे, प्रसाद आदी गोष्टीही बाजारात उपलब्ध आहेत.
मावळ तालुक्यातील कान्हे, टाकवे, कामशेत, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये दररोज सकाळ, संध्याकाळ हे साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.
दिवाळीत प्लॅस्टिकचे स्वस्तिक, लक्ष्मीची पाऊले, पणत्या यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा सर्वच वस्तूंचे दर जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. महागाई असली तरी खरेदीशिवाय पर्याय नसल्याने ग्राहक वस्तू विकत घेतात, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.





