कात्रज येथील श्री अंबामाता मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

पुणे: कात्रज येथील श्री अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे यंदाच्या नवरात्रौत्सवाची भक्तिमय तयारी करण्यात आली आहे. १९९३ मध्ये स्व. धनराजजी मालचंदजी राठी यांनी सुखसागर नगर येथे स्थापन केलेल्या या ट्रस्टने ३२ वर्षांपासून धार्मिक परंपरांचे जतन करत जन्माष्टमी, दत्तजयंती, गणपती उत्सव आणि नवरात्र महोत्सवासारखे कार्यक्रम यशस्वीपणे साजरे केले आहेत.
यंदा सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल. पूजा, अभिषेक, भजन, दांडिया, भोंडले आणि ऑर्केस्ट्रासह महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आहे. दररोज सकाळी ८ आणि सायंकाळी ७:३० वाजता आरती होईल, तर दिवसभर प्रसाद वाटप होईल. अष्टमीला फुलांची आकर्षक सजावट आणि हलवा-पुरीचा प्रसाद वितरित होईल. मान्यवरांच्या हस्ते आरती होणार आहे.
मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवक आणि सिक्युरिटी गार्ड्सची व्यवस्था आहे. महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सोय आहे. विश्वस्त मगराजजी एम. राठी, रविंद्र डी. राठी, राजेश डी. राठी आणि राठी परिवारासह स्वयंसेवक आणि पोलिस शिस्तबद्ध नियोजन करत आहेत. दररोज ५ ते ६ हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतील. परिसरातील मंडळांतर्फे देवीला तोरण अर्पण केले जाईल. भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टने केले आहे.





