Pimpri : डोणूआई देवी मंदिरात नवरात्रौत्सव उत्साहात

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पवन मावळ येथील डोणे गाव हे आपल्या ग्रामदैवत डोणूआई देवीमुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गावालाही नाव देवीच्या नावाने मिळाले आहे. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले हे ठिकाण श्रद्धा, भक्ति आणि परंपरांचा अनमोल वारसा जपत आहे.
सन २००७ मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने जुने मंदिर पाडून नव्याने भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली. आकर्षक वास्तुकला, उंच कळस, समोरची दगडी दीपमाळ आणि परिसरातील हिरवाई यामुळे मंदिराचे रूपडे अधिकच देखणे झाले आहे. भाविकांना येथे आल्यावर एक वेगळ्याच शांततेचा अनुभव मिळतो.
डोणूआई देवी हे एक जागृत देवस्थान मानले जाते. येथे दरवर्षी नवरात्रोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होतो. सलग नऊ दिवस देवीचा जागर होतो. मंदिरावर एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सकाळ-संध्याकाळ भजन, कीर्तन, आरत्या यामुळे गावात उत्सवी वातावरण निर्माण होते. फक्त धार्मिक कार्यक्रमच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमही राबविले जातात. या माध्यमातून समाजात ऐक्य आणि सेवाभाव रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचे एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्या वतीने सांगण्यात आले.





