चिंबळी परिसरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; दुर्गा मूर्तींच्या किमतीत 15 टक्के वाढ

चिंबळी : नुकताच गणेशोत्सव थाटामाटात साजरा झाल्यानंतर आता खेड तालुक्यातील कुरूळी, चिंबळी, मोई आणि केळगाव परिसरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या सोमवारी (दि. 21) पारंपरिक पद्धतीने घरोघरी आणि मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाणार असून, मंडळांच्या वतीने दुर्गा मातेच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
कुरूळी येथील कुंभारवाड्यातील प्रसिद्ध मूर्तिकार कैलास माळशिकर यांनी दोन फूट ते पाच फूट उंचीच्या आकर्षक दुर्गा मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्तींच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे यंदा मूर्तींच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एका मूर्तीची किंमत दोन हजार ते पंधरा हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
स्थानिक तरुण मंडळे आणि ग्रामस्थ उत्साहाने नवरात्रोत्सवाच्या तयारीला लागले असून, परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तिकार कैलास माळशिकर यांनी सांगितले, की यंदा मूर्तींची मागणी वाढली असून, प्रत्येक मूर्ती पारंपरिक आणि आधुनिक कलेचा संगम साधणारी आहे. नवरात्रोत्सवात या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेने परिसरातील धार्मिक वातावरण अधिकच खुलणार आहे.





