Satara | ‘द लेस्बियन’ संघर्ष आणि आत्मसन्मान याचा विवेकी आलेख

सातारा, (प्रतिनिधी) – ‘द लेस्बियन’ ही कादंबरी म्हणजे संघर्ष आणि आत्मसन्मान याचा एक विवेकी आलेख असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
यावेळी त्यांनी ह्या पुस्तकावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि वांग्मयीन मूल्याच्यादृष्टीने अन् कादंबरीच्या कथानकाच्या अंगाने अतिशय महत्त्वाची मांडणी केली.
महिलांच्या समलिंगी संबंधाच्या अनुषंगाने समाजात असलेले प्रश्न आणि त्यावर उपाय शोधू पाहणारी लेखिका म्हणून शुभांगी दळवी यांचा त्यांनी गौरव केला.
सातार्यातील लेखिका शुभांगी दळवी लिखित ‘द लेस्बियन’ या कादंबरीचा नुकताच प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. यावेळी उपस्थित असलेले लेखक आणि कवी स्वप्निल पोरे, कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, लेखिका सुचित्रा काटकर, अमृता तांदळे तसेच लेखक देवा झिंजाड यांनी ‘द लेस्बियन’ कादंबरीवर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन पुस्तकांवरती चर्चासत्र परिसंवाद आयोजित केले जातात.
जेणेकरून अनेक चांगले लेखक समाजापर्यंत पोहोचले जावेत आणि त्यांच्या साहित्यावर साधक-बाधक चर्चा व्हावी.
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिरीष चिटणीस असे अनेक उपक्रम आजवर घेत आलेले आहेत. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून‘द लेस्बियन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला.
कार्यक्रमाचे शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. पुस्तकाच्या लेखिका शुभांगी दळवी यांनी सर्वांचे आभार मानले.





