पुणे | आदिवासी कला, संस्कृतीला आपलेसे करणे आवश्यक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “आदिवासींची कला, संस्कृती वगळून विश्वात्मक कल्याणाचा विचार करणे अशक्य आहे. जंगलातल्या आदिवासी संस्कृतीला बाहेरच्या जगाशी जोडून घेणे, आदिवासींना आपलेसे करणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. आदिवासी कला, संस्कृतीकडे दुर्लक्ष करणे ही नेत्यांनी समाजाशी केलेली बेईमानी आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आदिवासी जमातीची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, त्यांची बोली भाषा, चालीरिती, जीवनशैली, धार्मिक कार्ये, देवदेवता, रुढी-परंपरा, कला, संगीत, नृत्य यातील वेगळेपणा सामान्य प्रेक्षकांना समजावा या उद्देशाने बहुरंगतर्फे पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आदिवासी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तर समारोप अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत झाला. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष आणि चित्रपट महोत्सवाचे संयोजक डॉ. कुंडलिक केदारी, सामाजिक कार्यकर्ते राज अग्रवाल उपस्थित होते.
चित्रपटाला जशी गोष्ट असते त्याचप्रमाणे चित्रपटाच्या गोष्टीपलिकडेही एक गोष्ट असते. चित्रपटाचा आत्मा जाणून घेतल्यास चित्रपट आवडू लागतील, चित्रपटांविषयी आपुलकी निर्माण होईल, असे भणगे म्हणाले.
आदिवासी चित्रपट महोत्सवाला अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करू तसेच भविष्यात महोत्सव भरविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून सहकार्य करू असे आश्वासन राजेभोसले यांनी दिले. डॉ. केदारी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र सुपेकर यांनी, तर आभार धीरज केदारी यांनी मानले.





