पिंपरी | तळेगावला उत्कृष्ट लेखकांची परंपरा – डॉ. श्रीपाल सबनीस

तळेगाव स्टेशन (वार्ताहर) – लेखक, साहित्यिक यांनी नेहमीच समाजातील घडणाऱ्या घटनांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाट करून दिली आहे. दिवसेंदिवस वाचकांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे साहित्याला जनाधार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. पुण्याचे उपनगर असलेल्या तळेगाव दाभाडे शहराला उत्कृष्ट लेखक, कवी, साहित्यिक यांची नेहमीच परंपरा राहिली आहे.
हीच परंपरा लेखक ओंकार वर्तले व श्रीकृष्ण पुरंदरे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जपली आहे, असे मत आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ते पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सबनीस पुढे म्हणाले की, ‘साहित्यिकांनी कुठल्याही जाती-धर्माच्या चौकटीत न अडकता सर्व-समावेशक लेखन केले पाहिजे. याचे भान ओंकार वर्तले आणि श्रीकृष्ण पुरंदरे यांनी ठेवले आहे.’
तळेगावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे कार्याध्यक्ष ओंकार वर्तले लिखित “एक झुंज वाघाशी” या कादंबरीचे व महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे लिखित “आनंदी आनंद” व “पद्यरेघा” या काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांचे हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष लेखक व कवी राजन लाखे, संगीत विशारद सुरेश साखळकर, नावीन्य प्रकाशनचे नितीन खैरे, बांधकाम व्यावसायिक संग्राम जगताप व मावळ शाखेचे सचिव योगेश घोडके हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवी राजन लाखे यांनी दोन्हीही लेखकांच्या पुस्तकाची समीक्षा करून असे साहित्य होणे हि मराठी साहित्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात सुरेश साखवळकर म्हणाले की, “कोणत्याही शहराचे वैभव हे तेथील साहित्यिक आणि कलावंत यावर ठरत असते. त्यामुळे वर्तले आणि पुरंदरे हे तळेगावचे साहित्यिक वैभव आहे.” असे मत व्यक्त केले.
लेखक ओंकार वर्तले आणि श्रीकृष्ण पुरंदरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी कवी सतीश साठे, अमेय गुप्ते, जयवंत पवार, स्वरा जोशी, अभय व्यास, सुधाकर देशमुख, नंदकुमार नागुलपिल्ले, प्रा. सत्यजित खांडगे, प्राचार्य सुहास सपाटे आदी साहित्यिक या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश घोडके यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. माधुरी वर्तले यांनी मानले.





