‘डिंभे’तून उजव्या कालव्याला शेवटचे आवर्तन

मंचर (प्रतिनिधी) -हुतात्मा बाबू गेनु सागर (डिंभे धरण) येथून उजव्या कालव्याला रविवारी (दि. 7) पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 70 गावांतील हजारो हेक्टर शेती पिकांना फायदा होणार आहे. उन्हाळी हंगामातील शेवटचे पाण्याचे आवर्तन असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
गेल्या हंगामात डिंभे धरण 100 टक्के भरले होते. साठलेल्या पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. जलसंपदा विभागाच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन केले असल्याने सर्वच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे, अशी माहिती कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी डी. एस. कोकणे यांनी दिली.
त्यामुळे उजव्या कालव्यात खालील 18 ते 20 हजार एकर क्षेत्र पाण्यामुळे हिरवेगार होण्यास मदत होणार आहे. टेल टू हेड असे पाण्याचे वाटप केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी थकवली आहे. त्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शंकर बांगर यांनी केले.





