Pune District : जागेचा व्यवहार ३० कोटी नव्हे; अवघा साडेसात कोटींचा : आमदार शरद सोनवणे यांचा संतप्त सवाल

नारायणगाव : जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी बाजार समितीच्या जागेचा नव्याने केलेला व्यवहार वरवर ३० कोटीचा दिसत असला तरी खरा व्यवहार साडेसात कोटीचा आहे. राहिलेले साडे बावीस कोटी कुठे गेले? अशावेळी जुन्नर तालुक्याचा सहाय्यक निबंधक कोणाचे ऐकणार? असा संतप्त सवाल आमदार शरद सोनवणे यांनी केला. पुढील काळात संघर्षाची लढाई झाली तर माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या आणि माय भगिनींच्या डोक्यावरून आमदारकी ओवाळून टाकेल आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उभा राहील. संजय काळे यांनी साडे बावीस कोटींपैकी तीन कोटी वाटायला ठेवले. कोणी बोलला तर त्याला पाकीट द्यायचे. रावणाची सोन्याची लंका जळाली तिथे काळेंची सहकाराची चोरलेली खुर्ची जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी आमदार शरद सोनवणे, बाजार समितीचे संचालक व शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व नारायणगावचे उपसरपंच बाबूभाऊ पाटे, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, जनमंगल संस्थेचे सचिन वाळुंज, शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव बस स्थानकापासून नारायणगाव उपबाजार समितीपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी व महिलांचा समावेश होता.
खुली सभा घेऊन दाखवा – सोनवणे
वार्षिक सर्वसाधारण सभेत संजय काळे यांचे मुठभर लोक संचालकांवर धावून गेले. सभेत संचालकांना बोलू दिले नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या संचालकांनी मांडल्या पाहिजे. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, असे असतानाही संचालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संजय काळे यांना आव्हान करतो, तुम्ही माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या पोटचे असाल तर शेतकऱ्यांची खुली सभा घेऊन दाखवा. शेतकरी तुमचे तीन तेरा वाजविल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी उन्हातान्हात कष्ट केले, ज्यांच्या बोकांडी कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांचे ३० कोटी रुपये तुम्ही खाल्ले. मी विकाऊ नाही, शरद सोनवणे पापाचा घडा भरलेल्या माणसाच्या उद्घाटनाला कधी गेला नाही आणि जाणार नाही.
आजच उद्घाटन का घेतले? पुढील पाच पिढ्या भीक मागणार
सन २०१० पासून १३ एकर जागा पडून असताना आजच उद्घाटन का घेतले? जुन्नर तालुक्याचा सहाय्यक निबंधक हरामी आहे. निबंधकाचं तीन पिढ्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. संजय काळे यांच्या पुढील पाचपिढ्या भिक मागणार, हा शेतकऱ्यांचा तळतळाट आहे. तीन विरोधक संचालकांनी आवाज उठवल्यानंतर तुम्ही २०१० साली खरेदी केलेल्या जागेच्या उद्घाटनाचा घाट आज घातला. चांगल्याला साथ देण्यासाठी रक्तामध्ये चांगुलपणा असावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असावे लागतात. हे संजय काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमितील लोकांची बोली लावली. सकाळी नरम संध्याकाळी गरम असा झाला हा बेशरम, अशा शब्दात काळे यांच्यावर शरद सोनवणे यांनी घणाघात केला.





