Pimpri : स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले

कामशेत : गणेशोत्सवाच्या उत्साहात भरभरून खर्च झाल्यानंतर नागरिकांना थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण पितृ पंधरवडा सुरू होताच स्वयंपाकघरावर पुन्हा महागाईचे सावट पसरले आहे. कामशेत भाजी मंडईत गेल्या आठवड्याभरात सर्व भाज्यांचे भाव झपाट्याने वाढले असून सामान्य गृहिणीचे गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
पितृपक्षात अळूची पाने, लाल भोपळा, कारले, गवार यांसारख्या भाज्यांना प्रचंड मागणी असते. श्राद्धभोजनात या भाज्या परंपरेने वापरल्या जातात. मात्र यंदा लागवड क्षेत्रात पावसाचा व्यत्यय आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळे बाजारपेठेत पुरवठा घटला आहे. परिणामी भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत.
गवार, कारले, वालशेंगा यासारख्या भाज्या खरेदी करताना आता दोनदा विचार करावा लागत आहे. रोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी कोथिंबीरही या महागाईला अपवाद ठरली नाही. दोन दिवसांत अळूची पाने २० रुपयांतून थेट ४० रुपयांवर गेली. दररोज भाजीसाठी बजेट ठरवणे अवघड झाले असल्याचे चित्र सध्या घरोघरी दिसत आहे.
दरवाढीमुळे रोजच्या स्वयंपाकासाठी ठरवलेले बजेट विस्कळीत झाले आहे. श्राद्धभोजनासाठी लागणाऱ्या भाज्यांसाठीच शंभर-दीडशे रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. अनेक गृहिणी बजेट सांभाळण्यासाठी रोजच्या भाज्यांचे प्रमाण कमी करताना दिसत आहेत. काही जणांनी गवार, वालशेंगा यांसारख्या भाज्यांऐवजी स्वस्त पर्याय म्हणून कोबी, बटाटा, कांदा याकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
ग्राहकांचे हाल
गणेशोत्सवात खर्च वाढल्याने आधीच घरगुती अर्थकारण ताणले गेले आहे. आता भाजीपाला महागल्याने गृहिणींचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. भाजी विकत घेताना दोनदा विचार करावा लागत असून. कोथिंबीरसारख्या साध्या वस्तूंचे दरही वाढल्याने हिशोब चुकत असल्याचे अनेक गृहिणींचे मत आहे. सध्या फक्त टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांच्या किंमती तुलनेने स्थिर असल्याने ग्राहक त्यालाच जास्त पसंती देत आहेत. परंतु पितृ पंधरवड्यामुळे परंपरेनुसार लागणाऱ्या भाज्या महाग झाल्याने सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होत असल्याचे दिसत आहे.
श्रावण संपला तरीही महागाई कायम
श्रावण महिन्यात मांसाहारी खवय्ये शाकाहाराकडे वळले होते, त्यामुळे त्या काळातही भाजीपाला महाग झाला होता. पितृपंधरवड्यात दर कमी होतील, अशी अपेक्षा होती, मात्र उलट वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
बाजारभाव
भाजीपाला सध्याचा दर (प्रति किलो/जुडी)
कंटोली रु २०० किलो
फ्लॉवर रु १२० किलो
घेवडा रु १२० किलो
टोमॅटो रु ५० किलो
भेंडी रु ६० किलो
गवार रु ८० किलो
कोबी रु ८०किलो
साधी मिरची रु ८०किलो
अळूची पाने रु ४०(५ पाने)
कोथिंबीर रु ४० जुडी





