Kamshet : पर्यटकांकडून खंडणी प्रकरणी आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
महामार्ग पोलीस अंमलदार निलंबित

Kamshet : लोणावळ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवत पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
या प्रकरणी महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्या खंडाळा पथकातील पोलीस अंमलदारांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एका पोलीस अंमलदाराचाही सहभाग निष्पन्न झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
फिर्यादी भुषीत शर्मा (वय २८) हे ५ जुलै रोजी मित्रांसह चारचाकी वाहनातून लोणावळ्याकडे जात असताना द्रुतगती मार्गावरील ताजे (ता. मावळ) परिसरात अंबर दिवा लावलेल्या वाहनातील सहा जणांनी त्यांना अडवले.
आरोपींनी स्वतःला महामार्ग पोलीस असल्याचे सांगत वाहनात अंमली पदार्थ असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर कारवाईची भीती दाखवत पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. घटनास्थळाची पाहणी, फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यात महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्या खंडाळा पथकातील तीन पोलीस अंमलदार, दोन होमगार्ड आणि एका ट्रॅफिक वॉर्डनचा सहभाग उघडकीस आला.
त्यानुसार पोलीस अंमलदार अमोल ननावरे (३६), तुषार डावरे (३३), होमगार्ड तुषार घाडगे (४१), किसन बोंबले (३२) आणि ट्रॅफिक वॉर्डन नितेश चव्हाण (३२) यांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली.
न्यायालयाने पाचही आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान महामार्ग सुरक्षा पोलीस पथकातील पोलीस अंमलदार अमोल अशोक वायकर याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा:





