Pune : हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा

पुणे – हवामान बदलाचे आव्हान पेलण्यासाठी सर्व क्षेत्र आणि यंत्रणांना त्याच्याशी सुसंगत धोरणात्मक बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी हा विषय केवळ तज्ज्ञ-अभ्यासकांपुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर तो राजकीय अजेंड्यावर यायला हवा, असे मत भवताल फाउंडेशन आयोजित हवामान बदल समजून घेताना या विषयावरील कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले.
नागरिकांमध्ये हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांना याबाबत नेमकी काय कृती करावी, याचे मार्गदर्शन होण्यासाठी भवताल फाउंडेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड क्लायमेट रिसर्च प्रोग्रॅम- आयआयटीएम हबतर्फे आयसर संस्थेमध्ये ही तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सहभागींना हवामान बदलाची पार्श्वभूमी, त्याचे विज्ञान – सद्यस्थिती, त्यातील गुंतागुंत, त्याचा ग्रामीण-शहरी भागावरील प्रभाव, शेती-पाणी-आरोग्य-पर्यावरण यांच्यावर होणारा परिणाम, त्यातून मार्ग काढण्यासाठी संस्था आणि वैयक्तिक पातळीवर होत असलेले प्रयत्न, काही कृती सत्र अशा सर्वांगीण पद्धतीने माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले.
आपण नैसर्गिक व्यवस्था नष्ट करत आहोत. त्याच वेळी हवामान बदलाचे आव्हान पेलण्यासाठी या व्यवस्था अधिक बळकट असण्याची आवश्यकता आहे. हे केवळ व्यक्ती, संस्था किंवा संघटनांच्या पातळीवर घडू शकणार नाही. त्यासाठी हा विषय राजकीय अजेंड्यावर आला पाहिजे, असे मत घोरपडे आणि जाधव यांनी व्यक्त केले.
औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाहतूक, ऊर्जा उत्पादने यासारख्या आर्थिक क्रियाकल्पांमुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी प्रदूषण, निसर्ग संसाधनांचा ऱ्हास, हवामान बदल यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शाश्वत विकास हा यावरील पर्याय आहे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. गुरुदास नूलकर म्हणाले.





