- महिनाभरापासून सुरू होते उपचार
कामशेत – कुसगाव येथील डोंगराच्या पायथ्याला 21 जुलैच्या आसपास कुत्र्याच्या हल्ल्यात एक भेकर जखमी झाले होते. याची माहिती मिळताच वन विभागाने ताब्यात घेऊन पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे उपचारासाठी पाठविले होते. गुरुवारी (दि. 19) भेकराची पुन्हा त्याच्या अधिवासात मुक्तता करण्यात आली.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले भेकर मादी जातीचे असून, त्याचे वय अंदाजे दोन वर्ष असल्याची माहिती वन्यजीव रक्षक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जखमी भेकरावर महिनाभर उपचार सुरू होते. हे भेकर पूर्ण बरे झाल्यानंतर रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला चिखलसे येथील वनक्षेत्रात सोडून दिले. या वेळी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे येथील तुहीन सातारकर, विश्वजित महाजन, वनरक्षक शीतल मेरगळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे, सदस्य जिगर सोळंकी, दक्ष काटकर, निनाद काकडे, यश वाडेकर उपस्थित होते.