Pune : हडपसर-सासवड रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा फटका; महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण
Pune : वडकीनाला पालखी मैदान परिसरात तब्बल १२ ते १५ तास वीज गायब; पाणीपुरवठाही विस्कळीत, आंदोलनाचा इशारा

Pune : हडपसर-सासवड रस्त्याच्या रखडलेल्या आणि बेशिस्त कामामुळे गेल्या वर्षभरापासून वीज समस्येच्या विळख्यात अडकलेल्या वडकीनाला पालखी मैदान परिसरातील नागरिकांना आता महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा मोठा फटका बसत आहे. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास गेलेला वीजपुरवठा तब्बल १२ ते १५ तासांहून अधिक काळ पूर्वसूचना न देता बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.
कडक उन्हाळ्यात दिवसभर वीज गायब असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले. वीज नसल्यामुळे पंखे, कुलर बंद पडले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला. याशिवाय बोअरवेल आणि पाणीपंप बंद पडल्याने परिसरातील पाणीपुरवठाही पूर्णपणे विस्कळीत झाला. अनेक कुटुंबांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने महिलांचे विशेष हाल झाले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हडपसर-सासवड रस्त्याच्या कामादरम्यान वारंवार केबल तोडणे, विद्युत खांबांचे अर्धवट स्थलांतर आणि नियोजनशून्य काम यामुळे परिसरातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. “एक दिवसही अखंडित वीज मिळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. दररोज दोन ते चार तास वीज खंडित होणे नित्याचे झाले असून आता तर महावितरणकडून १२ ते १५ तास वीज बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या वीजखंडितीपूर्वी महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नियमित आणि भरमसाठ वीजबिल भरूनही नागरिकांना अंधारात ठेवले जात असल्याची टीकाही परिसरातून होत आहे.
वीज नसल्यामुळे घरगुती कामे ठप्प झाली असून ऑनलाइन काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. उष्णतेमुळे नागरिकांची झोप उडाली असून संपूर्ण परिसरात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून वारंवार होणारे वीजखंडित कायमस्वरूपी थांबवावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची असेल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सागर मोडक आणि संतप्त नागरिकांनी दिला आहे.





