पुणे जिल्हा | शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर यांचे उपोषण मागे

मंचर, (प्रतिनिधी) – पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आंबेगावसह खेड व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेली सात दिवस उपोषण सुरू होते.
प्रशासनाने दखल घेऊन विविध मागण्यांची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने प्रभाकर बांगर यांनी आपले उपोषण सोमवार, दि. ७ रोजी सायंकाळी मागे घेतल्याचे सांगितले.
बुधवार, दि. २ रोजी पिंपळगाव येथे प्रभाकर बांगर आणि त्यांचे सहकारी संतोष पवार यांनी उपोषण सुरू केले होते.
उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांच्या मागण्यांचे दखल घेत तहसीलदार संजय नागटिळक, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी तुमच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण सोडण्याचे जाहीर केले आहे.
आंबेगाव जुन्नर तालुक्यातील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा. दुधाला ४० रुपये प्रतिलिटर बाजारभाव मिळावा.
भीमाशंकर व विघ्नहर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेअर्स अनामत रक्कम घेतलेल्या शेतकऱ्यांना सभासद करावे, कळमोडी, म्हाळसाकांत, कळमजाई, पांडवदरा प्रकल्पाबाबत निर्णय व्हावा.
भीमाशंकर कारखान्याने उसाच्या गाळपाची २६३ रुपये प्रतिटन रक्कम अधिक मिळावी. शेतीपंपांना दिवसा विद्युतपुरवठा करावा. नदीवरील मोटारींना १० पट पाणीपट्टी वाढवण्याचा व वॉटर मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा.
हिरडा पिकाला हमीभाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर व इतर कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाला स्थानिक महिला, नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता.
उपोषणाच्या सातव्या दिवशी आंबेगाव ते तहसीलदार संजय नागटिळक, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी उपोषणस्थळी भेट देत बांगर यांच्याशी चर्चा करत त्यांची फोनवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी चर्चा घडवून त्यांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून त्याबाबत उपाययोजना करू,
तसेच येत्या गुरुवारी मंचर प्रांत कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर बैठक लावून असे आश्वासन दिल्यानंतर प्रभाकर बांगर यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे.





