पुणे जिल्हा | आपदग्रस्त कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करा

मंचर, (प्रतिनिधी) – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याच्या शेततळ्यामध्ये चार लहान बालकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शासनाने आणि भीमाशंकर कारखान्याने आपदग्रस्त कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली ठिकाणी कुटुंबीयांची भेट घ्यायला गेल्यानंतर तेथील वस्तुस्थिती पाहिल्यावर जी कुटुंब या ठिकाणी राहतात, त्या कुटुंबाच्या घराच्या अगदी बाजूलाच शेततळे आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर शेजारी लगेच शेततळे असल्यामुळे येथील कुटुंबातील लहान मुले त्या शेततळ्याकडे जातात.
उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे ही मुले सुट्टीसाठी घरी आहेत. आई-वडील कामानिमित्ताने गेल्यानंतर या मुलांनी शेततळ्याला असलेल्या तार कंपाउंडच्या एका खांबाला दोरी बांधून शेततळ्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गंजलेला खांब तुटल्यामुळे चारही मुलांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. ही घटना दुर्देवी असून पोलिसांनी योग ती चौकशी करावी अशी मागणी केली आहे.





