सातारा, (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली असून राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न घेऊन आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन ही तिसरी आघाडी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील 225 घराणी आणि त्या घराण्यातील सदस्य आलटून पालटून राज्याच्या सत्तेत येत राहतात. या महायुती आणि महाविकास आघाडी शासनामध्ये माल तोच, पॅकिंग मात्र वेगवेगळे अशी परिस्थिती आहे. या दोघांनीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्य जनतेला सक्षम तिसरा पर्याय देण्याकरता चळवळीतील नेते वामनराव चटप, शंकरराव धोंडगे, संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली असून त्यांच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी पुणे येथे होत आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर, सातारा, माण, कोरेगाव व वाई या सहा विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना व कोअर कमिटी चर्चा करून उमेदवार देणार आहे, हे उमेदवार सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन जनतेच्या समोर जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचे थडगे बांधून विकास करणार आहात का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. राज्यात शेती उत्पादन, शिक्षण व्यवस्था तसेच राजकीय व्यवस्था यांच्या बदलामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी निश्चित क्रांती घडवेल, असे सक्षम चेहरे देऊ, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, 25 ऑक्टोबर रोजी 23 वी ऊस परिषद भरवली जाणार असून दरासंदर्भात या परिषदेत चर्चा होईल. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला पहिली उचल दोनशे रुपये व यंदाच्या उसाला किती दर घ्यायचा हे ठरवले जाणार आहे. जिल्ह्यातील कारखानदारीचे साखर उतारे चांगले असताना कारखाने ३५०० रुपयांपेक्षा जास्त दर देऊ शकत नाही, हाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा आहे. कारखान्याने जास्तीत जास्त दर द्यावा आणि ते देणे शक्य आहे, असे राजू शेट्टी यांनी ठामपणे सांगितले. चुकीचे निर्णय आणि उधळपट्टी… महाविकास आघाडीने भूमी अधिग्रहण अथवा एफआरपी यासंदर्भात चुकीचे निर्णय घेतले तसेच महायुतीसुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जनतेशी घेणे देणे नसलेले प्रतिनिधी आहेत. एकीकडे पैशाची लय लूट सुरू असताना दुसरीकडे मुलांच्या शिष्यवृत्तीचे 3300 कोटी रुपये प्रलंबित आहेत. असे सरकार काय कामाचे, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला