Leopard Trapped – आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात सलग ३ दिवसात तिसरा बिबट्या जेरबंद झाला. पिंपळगाव खडकी गावच्या हद्दीत असलेल्या लिंबाचामळा येथील परिसरात एकाच वेळी ४ बिबटे फिरत असल्याचे योगेश बांगर यांनी पाहिले होते. बांगर यांनी ही माहिती वन खात्याला दिली. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी या भागात तातडीने पिंजरा लावण्याची सूचना केली.त्यानुसार वन विभागाने बबन अहिलु बांगर यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता.या पिंजऱ्यामध्ये शुक्रवार दि.६ रोजी पहाटे १ बिबट्या जेरबंद झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा शनिवार दि.७ रोजी सकाळी 2 रा बिबट जेरबंद झाला. त्यानंतर पुन्हा शनिवार रात्री त्याच ठिकाणी पिंजरा लावण्यात आला व रविवार दि.८ रोजी पहाटे तिसरा बिबट्या पिंजऱ्यात आला.ही अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी एका ठिकाणी त्याच स्पॉटवर दोन बिबटे जेरबंद झाल्याचे वनपाल सोनल भालेराव यांनी सांगितले.परंतु एकाच ठिकाणी सलग ३ दिवसात तीन बिबटे जेरबंद झाल्याची कळंब वन परिमंडळातली पहिलीच घटना आहे. अशी माहिती वनपाल सोनल भालेराव यांनी दिली. वनरक्षक संपत तांदळे, वनसेवक जालिंदर थोरात, किसन पोखरकर यांनी जाऊन बिबट्याला ताब्यात घेतले आहे. हा बिबट् मादी असून त्याचे वय ३ ते ३.५ वर्ष आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात सोडण्यात येणार आहे. दरम्यान या भागात ४ बिबटे एकत्रित रित्या फिरताना आढळले होते. यातील तिसरा बिबट्या जेरबंद झाला असून उर्वरित १ बिबट परिसरात असण्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने त्याच जागी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांनी तात्पुरता तरी सुटकेचा निश्वास सोडला असून ग्रामस्थांनी वनाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. लिंबाचामळा परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्यांचा वावर आहे. कामे करताना काळजी घ्या नागरिकांनी दक्षता व काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगून वनपाल सोनल भालेराव म्हणाल्या, सायंकाळी व रात्रीच्या वेळी एकटे फिरू नये. लहान मुलांना एकट्याने ओट्यावर सोडू नका.रात्रीच्या वेळी अंगणात बाहेर झोपू नये, शेतातील कामे करावीच लागतात. मात्र, रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी जाताना हातात काठी व टॉर्च ठेवावा. दुचाकीवर जात असताना हॉर्न वाजवत व इंडिकेटर सुरू ठेवून प्रवास करावा. नागरिकांनी काम नसेल तर घराबाहेर पडू नये.असे आवाहन वनविभागाने केले आहे.