सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघाले होते हेलिकॉप्टर; त्यापूर्वीच घडली दुर्घटना

पुणे – बावधन बुद्रुक परिसरात डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे सातच्या दरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले.
हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. कॅप्टन गिरीश पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते.
सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. ते काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते.
आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.
दाट धुक्यांमुळे हेलिकॉप्टर कोसळले
या घटनेची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ४ वाहने रवाना झाली आहेत. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. दिल्लीच्या Heritage Aviation Pvt. Ltd. कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्यामुळे आतमध्ये असणाऱ्या मृतदेहांची अवस्थाही भयानक झाली आहे.





