पिंपरी | कॉलराची साथ आटोक्यात आल्याचा आरोग्य विभागाचा दावा

पिंपरी, (प्रतिनिधी) – काही दिवसांपूर्वी भोसरीत आढलेले १० कॉलरा (पटकी) बाधित रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान नव्याने एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. शहरामध्ये भोसरी-धावडे वस्ती येथे कॉलराचा पहिला रुग्ण ८ जूनला आढळून आला.
११ तारखेला सर्वेक्षणानंतर नव्याने आणखी २ रुग्ण आढळून आले. १४ तारखेला त्यामध्ये नवीन ४ रुग्णांची भर पडली. तर, १७ तारखेला आणखी ३ रुग्णांची नोंद झाली. भोसरीतील धावडे वस्ती परिसरामध्ये पहिला रुग्ण आढळून आल्याच्या दिनांकापासून फिल्ड कर्मचार्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येकी २ सदस्य असलेल्या एकूण ४४ टीम्समार्फत आजअखेर २६ हजार ८४२ घरांतील ७४ हजार ९३१ इतक्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये १६६ संशयित आढळून आले.
त्यांना दिवसातून २ वेळा ७ दिवसांसाठी कॅप्सूल डॉक्सीसाइक्लिन देण्यात आल्या आहेत. सर्व संशयित रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. बाधित १० रुग्णांच्या ७६ सहवासितांना कॅप्सूल डॉक्सिसाइक्लिन देण्यात आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.
अशी घ्या काळजी
– नागरिकांनी महापालिकेच्या नळावाटे होणा-या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये.
– शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत, तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.
– प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे
– शौचास जाऊन आलेनंतर हात साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
– नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा.
– उलट्या-जुलाब, ताप, इत्यादी लक्षणे असल्यास वेळीच पालिकेच्या दवाखाना व रुग्णालयात उपचार घ्यावेत.
– पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून थंड झाल्यानंतर पिण्यासाठी वापरावे.
– सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचारास आलेल्या कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांची माहिती पालिकेच्या नजिकच्या दवाखाना किंवा रुग्णालयास कळवावी.
– जेथे लेबर कॅम्प येथे सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे.
– जलजन्य आजार होऊ नयेत याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन दक्षता घ्यावी.
– पालिकेच्या सर्व रुग्णालयात उपचाराची सोय उपलब्ध आहे.
– नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच योग्य ती काळजी घ्यावी.





