घरातील प्रमुख महिलेला मिळणार महिन्याला तब्बल ‘एवढे’ रुपये; पुढच्या महिन्याच्या ‘या’ तारखेपासून सुरु होणार ‘गृहलक्ष्मी योजना’

बंगळूर : कर्नाटक राज्यात ‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील प्रमुख महिलेला दार महिन्याला दोन हजार रुपये देण्याच्या योजनेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील कितीतरी महिलांना आर्थिक हातभार लागणार आहे.
विधान परिषदेत सदस्या हेमलता यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन अर्ज कोणत्या तारखेपासून सादर करायचा याची माहिती देणार आहे. या योजनेची आणखी माहिती देताना त्यांनी,”आर्थिक सहाय्य योजनेचे अॅप तीन ते चार दिवसांत प्रसिद्ध केले जाईल, स्पष्ट केले. चार ते पाच दिवसांत अॅप प्रसिद्ध होईल. १६ ते १७ ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील. आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून उद्घाटनाची तारीख निश्चित करू. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.
दरम्यान, गृहलक्ष्मी योजनेचा वार्षिक खर्च ३० हजार कोटी असेल, असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १७ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासन दिले होते, त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. याबाबत कोणीही शंका घेऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.
दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना स्वाभिमानाने आणि शांतीचे जीवन जगण्यासाठी सरकारकडून ही छोटीशी मदत आहे. आपल्या सरकारच्या पाच हमी योजनांपैकी ‘गृहलक्ष्मी योजने’ला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी १०९ हेल्पलाइनवर माहिती शेअर केली आहे. त्याची पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल, असे त्या म्हणाल्या.




