पुणे जिल्हा | महायुतीमुळे गुंजवणी योजना रखडली

नीरा, (वार्ताहर) – प्रस्तावित गुंजवणीची पाणीपुरवठा योजना ही मूळ लाभार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. या भागातील संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. मात्र सध्या प्रस्तावित असलेली बंद पाइपलाइन योजना संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणत नाही. त्यामुळेच या योजनेचे काम सध्या थांबलेल आहे. सरकारकडे यामध्ये दुरुस्तीचे प्रस्ताव दिले आहेत.
मात्र नवीन दुरुस्तीला महायुती सरकारकडून आडकाटे घालण्यात आले आहेत. तत्कालीन राज्यकर्त्यांनी कोणतेही बदल न करता येणारे टेंडर कंपनीला दिले आहे. हे टेंडर देताना कंपनीच्या हिताचा जास्त विचार करण्यात आला आहे. लोकांना होणारा फायदा यातून फारच कमी आहे आणि म्हणून लोकांनीच हे काम अडवून धरले आहे.
त्यामुळे गुंजवणी बंद पाइपलाइन योजना रखडलेली आहे. अस म्हणत माजी मंत्री गुंजवणीच्या पाण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप आ. संजय जगताप यांनी केला आहे.
आमदार संजय जगताप हे रविवारी (दि. 28) नीरा येथे आले होते. यावेळी जगताप यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. ग्रमस्थांच्या निवडणूक बहिष्कारावर आमदार जगताप म्हणाले की, सध्याचे सरकार आणि काही लोक ही गुंजवणीची पाणीपुरवठा योजना स्वतःच्या फायद्यासाठी राबवत आहेत.
या गुंजवणी सिंचन योजनेतून जेवढे क्षेत्र भिजणे आवश्यक आहे. तेवढ्या क्षेत्राला या बंद पाइपलाइन योजनेद्वारे पाणी मिळणार नाही. कंपनीने केलेला सर्व्हे आणि सुरू असलेले काम हे चुकीच्या पद्धतीने होत आहे.
त्यामुळे ते काम ग्रामस्थांनीच बंद पाडले आहे. कंपनीला देण्यात आलेले टेंडर हे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता न येणारे आहे. त्यामुळे कंपनी त्यात कोणतेही बदल करता येत नाही.अधिकारी स्वतःहून त्यात कोणताही बदल करू शकत नाहीत. त्यामुळे ते काम सध्या रखडले आहे. सरकारमध्ये उठबस करणार्या काही लोकांनी या योजनेमध्ये बरेच अडथळे आणले आहेत. त्यामुळे या योजनेचे काम रखडलेल असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीवर बहिष्कास्त्र
गुंजवणी सिंचन योजना जुन्या सर्व्हे नुसार करावी व काम त्वरीत सुरू करावे, अन्यथा आगामी सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गुंजवणीचे मूळ लाभार्थी वाल्हे, राख, आडाचीवाडी, सुकलवाडी, परींचे, हरणी या गावांनी दिला आहे.
तेव्हा तालुका बागायती करणार
पुढील दोन-चार महिन्यात आघाडी सरकार सत्तेवर येईल. यानंतर पुरंदर तालुक्यातील सर्वच सिंचन योजना मार्गी लावल्या जातील. टेंडरमध्ये बदल केले जातील आणि योजना पूर्ण केली जाईल. पुरंदर उपसा, जानाई – शिरसाई योजना आणि गुंजवणी पाणीपुरवठा योजना यांच्या माध्यमातून संपूर्ण पुरंदर तालुका सिंचनाखाली आणून बागायत केला जाणार आहे, असा विश्वास त्यावेळी संजय जगताप यांनी व्यक्त केला.





