पुणे | विश्वासार्हता निर्देशांकाची “महा’लपवाछपवी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे परिमंडळालाही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा घटनेला सामोरे जावे लागत आहे. जानेवारीत पुण्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या ६८७ घटना घडल्या. त्यामध्ये जवळपास २२ लाख ग्राहकांना १,४९६ तास विजेविना राहावे लागले, तर मार्चमध्ये संपूर्ण पुणे परिमंडळात तांत्रिक बिघाडाच्या ८९१ घटना घडल्या. त्यामध्ये ३१ लाख पुणेकरांना २,४७२ तास अंधाराचा सामना करावा लागला. हे प्रकार महावितरणच्या जानेवारी व मार्चच्या विश्वासार्हता निर्देशांकातून उघड झाले आहे.
वीज नियामक आयोगाच्या नियमावलीनुसार महावितरणने दर महिन्याला विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. त्यातून वीजपुरवठा किती वेळा खंडित झाला, ग्राहकांना किती काळ अंधारात बसावे लागले, विजेची वारंवारता किती वेळा कमी झाली, याची माहिती प्राप्त होत असते.
परंतु, महावितरणने जानेवारीनंतर मासिक विश्वासार्हता निर्देशांकच जाहीर केले नव्हते. त्यामुळे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी आयोगाला पत्र पाठवून हे निर्देशांक दरमहा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महावितरणने गुलदस्त्यात ठेवलेले निर्देशांक प्रसिद्ध केले.
महावितरणने दर महिन्याला विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. मात्र, कान पिळल्यावरच काम करायची सवय कधी जाणार? राज्य वीज नियामक आयोग हे निर्देशांक बघते का, तसेच ग्राहक सेवेच्या ढासळत्या दर्जाबाबत महावितरणला जबाबदार धरून कधी कारवाई करणार, या प्रश्नांची उत्तरे ग्राहकांना मिळाली पाहिजेत. – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच
राज्यभरातही तोच प्रकार…
पुण्यासह राज्यात मार्च महिन्यात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या १६ हजार ४४२ घटना घडल्या. त्यामुळे सुमारे तीन कोटी ग्राहकांची २८ हजार ०७६ तास बत्ती गुल झाली. जानेवारीत वीजपुरवठा ठप्पच्या तेरा हजार घटना घडल्या. याचा सुमारे सव्वादोन कोटी ग्राहकांना २३ हजार ४३४ फटका बसला आहे.




