चिंबळी: श्री क्षेत्र आळंदी जवळील केळगाव (ता. खेड) येथे श्री खंडोबा देवाचा शुभमंगल विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व भव्य मंडप उभारण्यात आला होता. गुरुवार १ जानेवारी रोजी पहाटे ५ ते ६ या वेळेत देवाचा अभिषेक करण्यात आला. हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी 2 जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता रघुनाथ महाराज मंदिर ते श्री खंडोबा महाराज मंदिरापर्यंत वाजत-गाजत देवाच्या ‘परण्या’ भव्य मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता हळदीचा कार्यक्रम पार पडला, तर ठीक ६ वाजता देवाचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी स्नेहभोजनाचे महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. या मंगल सोहळ्यासाठी केळगाव, हनुमानवाडी, चिंबळी, मोशी, आणि भोसे परिसरातील सुमारे दोन हजार भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.