पुणे जिल्हा : उपनिरीक्षकपदी केळगावची रसिका

ग्रामस्थांनी जल्लोष करून केला सन्मान
चिंबळी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेत केळगाव (ता. खेड) येथील शेतकरी कुटुंबातील रसिका नितीनकुटे या तरुणीने उज्ज्वल यश संपादन केले. तिच्या यशस्वी वाटचालीतून केळगावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या निमित्त केळगावात समस्त ग्रामस्थ आणि कुटे कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्र परिवार यांनी जल्लोष केला असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन करून सत्कार केल्याची माहिती केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले यांनी दिली.
रसिका ही नितीन सदाशिव कुटे यांची कन्या असून त्यांनी नोकरी आणि शेतीच्या जोडधंद्याच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलांचे शिक्षणाकडे लक्ष दिले. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलांना शिक्षण दिले.
रोजच्या दगदगीच्या जीवनातून मुलीला पाहिजे त्या गोष्टीतून सहकार्य केले. तिच्या या संघर्षामध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आई-वडील, आजी, आजोबा, चुलते, काकी इतर नातेवाइकांनी सहकार्य केले.





