पिंपरी,(प्रतिनिधी) -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विश्व मैत्री संघाच्या वतीने रविवार (दि.27) रोजी राष्ट्र गौरव पुरस्कार 2021 – 22 चे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवरांना राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार होते. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांचा शहर दौरा ऐनवेळी रद्द झाला. विश्व मैत्री संघाच्या वतीने राष्ट्र गौरव पुरस्काराचे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे दुपारी 2 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये 1008 महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती, भटक्या व विमुक्त जाती जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू ईधाते, माजी लेप्टनंट जनरल एल. निशिकांत सिंह, स्वामी समर्थ केंद्राचे नितीन मोरे, उद्योजक ओमप्रकाश रांका, बेटी बचाओ जन आंदोलनाचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. प्रमोद लोहार, युवा समाज सेवक डॉ. मनिष गवई, युवा उद्योजक अजित ओझा आणि वाल्मिक समाज संस्थेचे अध्यक्ष राजेश बडगुजर आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार होता. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी ऐनवेळी शहर दौरा रद्द करून पुण्याकडे रवाना झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थींना पुरस्कार देण्यात आले. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या राज्यापालांच्या विरोधात निषेध आंदोलन करून काळे झेंडे दाखविण्याचा संभाजी बिग्रेडसह काही सामाजिक संघटनांनी इशारा दिला होता. काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली होती.