पुणे जिल्हा | खेडमधील अधिकार्यांचे प्रताप!

राजगुरूनगर, {रामचंद्र सोनवणे}- खेड तालुक्यात प्रांत, तीन तहसीलदार आणि भूमी अभिलेख (मोजणी कार्यालय)चे उपअधीक्षक असे एकामागून एक वर्ग एकचे अधिकारी एका मागून एक निलंबित झाले. काहींचे खेड तालुक्यात येण्या अगोदरचे कारनामे आणि काहींचे खेड तालुक्यात आल्या नंतरचे कारनामे यामुळे त्यांचे निलंबन झाले.
खेड तालुका अधिकारी वर्गासाठी सोन्याचे अंडे देणारा असा असल्याने तालुक्यात नेहमीच अधिकारी वर्गातून भ्रष्टाचार झाला आहे. केवळ अधिकारी नव्हे तर कर्मचारी भ्रष्टचारी असल्याने अनेक जण लाच लुचपत विभाग पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
खेड तालुक्यात सुचित्रा आमले, डॉ. वैशाली वाघमारे, प्रशांत बेडसे हे सलग तीन तहसीलदार निलंबित झाले निलंबनाची त्यांनी हॅट्ट्रिक साधली. खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे यांचेही निलंबन झाले.भूमी अभिलेख (मोजणी कार्यालय)चे उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांचे निलंबन झाल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
खेड तालुक्यात यामुळे जनतेची कामे करण्यात अधिकारी दिरंगाई करीत होते. जेथून बदली होऊन आले तेथेही त्यांनी काहीतरी चुकीचे काम करून ते खेड तालुक्यात आले होते. त्यामुळे निलंबनाची कारवाईला त्यांना सामोरे जावे लागले.
खेड तालुका पैशांची खाण आहे हे समजून वरिष्ठ पातळीवर वशिला लावून अगर पैसे देऊन अधिकारी खेड तालुक्याला पसंती देतात. तालुक्यात जगातील नावाजलेली चाकण एमआयडीसी, विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ), रिंगरोड, विकसित झालेल्या ग्रामपंचायती, रेल्वे प्रकल्प आणि हद्दपार झालेले विमानतळ असे मोठे प्रकल्प खेड तालुक्यात आहेत, त्यामुळे जमिनी, घरे, बंगले यांना सोन्याचे भाव आले आहेत. त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म झाला आहे. जनतेची कामे करण्यापेक्षा अधिकारी, कर्मचारी जास्त लक्ष पैसे कमावण्यावर दिले जात आहे.
आतापर्यंत पाच अधिका-यांचे निलंबन
खेड तालुक्यात अधिकारी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांच्यात नेहमीच संघर्ष झाला. यातूनच काहींचे बदली अगोदरचे प्रताप आणि काही अधिकार्यांचे तालुक्यात कमी करताना केलेले प्रताप यामुळे आतापर्यंत 5 अधिकार्यांचे निलंबन झाले आहे. त्यांच्या बरोबरीने महसूल, पंचायत विभागात काम करणारे अनेक कर्मचारी मागील पाच वर्षांच्या काळात लाच लूचपत विभागाच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
वास्तविक लाच घेणार्या लोकसेवकाला कायमचे कामातून काढून टाकले पाहिजे; मात्र तसा कायदा नाही. लाच घेणारे लाच घेतलेल्या ठिकाणावरून दुसरीकडे बदली करून काम करतात. न्यायालयात तारिक पे तारिक होते त्यामुळे लाच घेणार्यांना याबाबत काहीच वाटत नाही. तालुक्यात अनेक नागरिक लाच देऊन कामे करत असल्याने अधिकारी वर्गाला आयते घबाड मिळत आहे.
पायंडा बंद करणे गरजेचे
खेड तालुक्यात अनेक अधिकार्यांनी चांगले काम केले आहे; मात्र काही अधिकारी याला अपवाद ठरले आहेत. काहींची तडकाफडकी बदली झाली तर काही अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई झाली. तालुक्यात नव्याने येणार्या अधिकार्यांनी मागील अधिकार्यांच्या निलंबनाचा धसका घेत तरी चांगले काम करतील,
अशी अशा नागरिकांना लागणे अपेक्षित असले तरी काम करून घेण्यासाठी लाच देणा-या नागरिकांनी हा पायंडा बंद करणे आवश्यक आहे. तथापि लाच देऊन काम करून देणार्यां लोक सेवकांवर सामाजिक संस्था, माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी जागरूकपणे लढा दिला पाहिजे.





