निगडी उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा फज्जा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या निगडी येथील उड्डापुलाचे उद्घाटन करण्याचा चंग बांधलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे चांगलाच फज्जा उडाला. उद्घाटनाशिवाय हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला पायउतार व्हावे लागले. तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. गेल्या चार वर्षांत हे काम पूर्ण करण्यात आले. राज्यस्तरीय नेत्याच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचा चंग स्थानिक नेत्यांनी बांधला होता. मात्र वरिष्ठ नेत्यांकडून वेळ मिळत नसल्याने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डावलून या पुलाचे उद्घाटन करण्याची खेळी सत्ताधाऱ्यांनी केली होती.
तर पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना उद्घाटनासाठी बोलविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्वत: अजित पवार व भाजपाच्याही वरिष्ठ नेत्यांनी उद्घाटनास येण्याकडे दुर्लक्ष केले. पूल तयार असतानाही वाहतुकीस खुला होत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी या पुलाचे गाजावाजा करत उद्घाटन केले होते. यानंतर या ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे हा पूल उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी बंद करण्यात आला होता. ही कामे पूर्ण झाल्यानंतर आज बुधवारी (दि. 18) या पुलाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते व पालिकेतील प्रमुख पदाधिकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार होते.
त्यासाठी पुलाला हार बांधण्यात आले होते तसेच रोषणाईसाठी लाइटच्या माळाही सोडण्यात आल्या होत्या. मात्र, अचानकपणे झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला. या पुलाच्या उद्घाटनाकडे भाजपाचा एकही नेता न फिरकल्याने उद्घाटनाविनाच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.





