कडकडीत बंदचा चौथा दिवस ! पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजूनही तणाव

इस्लामाबाद – महागाई आणि वीजेच्या वाढीव दरांच्या विरोधात पाक व्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांनी पुकारलेल्या सार्वत्रिक बंदचा आज चौथा दिवस होता. या भागात अजूनही तणावाची स्थिती आहे.
येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसाचार उसळला आहे. या स्थितीची दखल पाक सरकारने घेतली असून पाक व्याप्त काश्मीरसाठी २३ अब्ज रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
पाक व्याप्त काश्मीरमधील हिंसक निदर्शनांमध्ये शनिवारी एक पोलीस अधिकारी ठार झाला असून सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. संपूर्ण बंदचा आज चौथा दिवस असल्यामुळे या भागातील सर्व व्यवहार ठप्प आहेत.
आंदोलक आणि स्थानिक सरकारांमध्ये आज वाटाघाटी करण्यासाठी बैठक झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे आंदोलकांना शांत करण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पीओकेसाठी तातडीने २३ अब्ज रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पंतप्रधान शरीफ यांनी पीओके संदर्भात एक विशेष बैठक देखील बोलावली होती. या बैठकीला पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वर उल हक, स्थानिक मंत्री आणि वरिष्ठ राजकीय नेते उपस्थित होते, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील मंत्री आणि आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे नेतेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये पीओकेमधील स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पंतप्रधान शरीफ यांच्या निर्णयाचे या सर्वांनी स्वागत केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
गव्हाच्या पीठाच्या वाढलेल्या किंमती, वाढीव वीज दर आणि प्रतिष्ठिंतांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या विरोधात जम्मू काश्मीर जॉइंट ऍक्शन कमिटीने पीओकेमध्ये बंद पुकारला आहे.
या कमिटीच्या नेतृत्वाखाली पीओकेची राजधानी मुजफ्फराबादपर्यंत एक लॉंग मार्च काढण्यात आला. वाटाघाटीमध्ये सरकारी बाजूकडडून पीओकेच्या मागण्या टाळण्याची प्रवृत्ती दिसून येत असल्याची टीका रावळकोटमधील नेत्याने केली आहे.
आंदोलकांनी यापूर्वीच कोहला मुझफ्फराबाद रोड आणि इतर अनेक ठिकाणचे व्यवहार बंद करून ठिय्या मांडला आहे. हा ४० किलोमीटरचा रस्ता कोहला शहराला राजधानी मुजफ्फराबादला जोडतो. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला गेल्यामुळे मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.





