क्रिकेट कॉर्नर : ऑस्ट्रेलियाकडून सिराजवर ‘बोलंदाजी’चे बाउन्सर्स….

ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भन्नाट यॉर्करवर कांगारूंच्या ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केले. हेडने त्याच षटकात सिराजला 1 चौकार व 1 षटकार लागवल्यानंतर सिराजने हेडला बोल्ड करताना, जोरदार पुनरागमन केले. मात्र, हीच गोष्ट कांगारूंना खटकल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सर्व बाजूने सिराजवर ‘बोलंदाजी’ करताना त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सिराजने या प्रकाराला बळी न पडता, विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करण्याची शैली कायम ठेवावी.
यापूर्वी देखील ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाडूंच्या समर्थनार्थ अनेकदा बोलंदाजी केली आहे. यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी बोलंदाजी करताना समोरच्या खेळाडूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सिराज व हेड यांच्या प्रकरणावर आयसीसीने दोन्ही खेळाडूंना दोषी धरले आहे. सिराजला त्याच्या सामना फीसवर 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर ट्रॅव्हिस हेडवर देखील कारवाई करताना, आयसीसीने त्याचा १ मेरिट पॉईंट कमी केला आहे. दोन्ही खेळाडूंनी चूक केली असली, तरी देखील अजूनही ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सिराजवरच आक्रमकपणाचे खापर फोडण्यात व्यस्त आहेत.
सध्याच्या घडीला सिराज हा भारतासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. सिराजने या मालिकेत आतापर्यंत विशेष छाप पाडलेली नाही. असे असले तरी अनेक ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्याच्याविरुद्ध धावांसाठी झगडावे लागत आहे. सिराजने या मालिकेत 4 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक षटके टाकताना, 178 धावांच्या मोबदल्यात 35.22 च्या सरासरीने 9 फलंदाज बाद केले आहेत. या मालिकेत मोहम्मद सिराज सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीमध्ये 4थ्या स्थानी आहे. त्याची इकॉनॉमी देखील केवळ 3.36 आहे.
बॉर्डर-गावसकर चषकासारख्या मालिकेत आपली चांगली कामगिरी करण्यासाठी प्रत्येक खेळाडू आतूर असतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूने मैदानावर आक्रमकपणा दाखवला, तर तो चुकीचा कसा काय ठरू शकतो? यापूर्वी देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अनेकादा खेळापेक्षा ‘बोलंदाजी’करून समोराच्याला खेळाडूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
IND vs AUS 2nd Test : सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडलं महागात, ICC ने केली मोठी कारवाई….
सचिन तेंडुलकर, हरभजनसिंग, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग, रविचंद्रन अश्विन यांच्यावर देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानात व मैदानाबाहेर आपल्या बोलंदाजीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या सर्वानी आपल्या कामागिरीने या ऑस्ट्रेलियाच्या बोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आगामी काळात सिराज देखील आपल्या कामगिरीनेच ऑस्ट्रेलियाच्या बोलंदाजांना उत्तर देईल, अशी आशा करूया.





