झेंडा असा बांधला की गाठ सुटता सुटेना…; CM शिंदेंना करावी लागली कसरत, अखेर पोलिसाने फडकविला तिरंगा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाले. पण यावेळी एक वेगळाच प्रसंग घडला. ध्वजारोहणाची तयारी करणाऱ्यांनी बांबूवर झेंडा असा आवळून बांधला की, एकनाथ शिंदेंना तो फडकावताना मोठी कसरत करावी लागली. काही केल्या त्यांना गाठ सुटली नाही. अखेर त्यांच्याजवळ उभ्या असणाऱ्या पोलिसाने झटका देऊन ती गाठ सोडून झेंडा फडकावला अन् त्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले.
त्याचे झाले असे की, मुंबई स्थित मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी झेंडा फडकावताना मुख्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागली. काही केल्या त्यांना झेंड्याची गाठ सुटत नव्हती. त्यांनी झटके देऊनही झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला. पण बांधणाऱ्याने अशी गाठ बांधली होती की, ती काही केल्या सुटतच नव्हती.
मुख्यमंत्री जवळपास 30 सेकंद झेंड्याची दोरी ओढत ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करत होते. पण गाठ काही सुटत नव्हती. अखेर त्यांच्याजवळ उभ्या असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने झटका देत दोरी ओढली आणि तिरंगा फडकला. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
स्वातंत्र्यसैनिकांना वाहिली श्रद्धांजली
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाच्या सर्वच नागरिकांना शुभेच्छा. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मी वंदन करतो. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत पैसे जमा होत असल्याचेही सांगितले.
ध्वजारोहण व झेंडा फडकवणे मधील फरक?
उल्लेखनीय बाब म्हणजे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज एका दोरीच्या सहाय्याने खांबाच्या वरच्या भागात चढवला जातो. त्यानंतर दोरीने त्याची गाठ ओढून तो फडकावला जातो. त्याला ध्वजारोहण असे म्हटले जाते. याऊलट 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज खांबावर बांधला जातो. तो केवळ दोरीची गाठ ओढून फडकवला जातो. त्याला झेंडा फडकवणे असे म्हणतात.





