रेशनिंग दुकानात बियाणे विक्री धोरणाचा फज्जा
पुणे – राज्यातील रेशन दुकानांमधून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देणारी प्रणाली गेल्या तीन वर्षांपासून धूळखात पडली आहे. कृषी आणि नागरी पुरवठा विभागाचा समन्वय नसल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे रेशनिंग विक्रेत्यांना याचा फटका बसत आहे. तर बियाणे विक्रेत्यांनी मात्र या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना राज्यभर स्वस्त दुकानांमधून प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत ऑक्टोबर 2016 मध्ये प्रस्ताव तयार झाला. हा प्रस्ताव मार्च 2017 मध्ये राज्य शासनाने मंजूर करून अंमलबजावणीचे काम कृषी विभागाकडे दिले होते. अर्थात, पुरवठा विभागाने यात पुढाकार न घेतल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून अद्यापही बियाणे विक्री होऊ शकलेली नाही.
राज्याच्या पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार रेशन दुकानातून शेतकऱ्यांना बियाणे विकण्याची परवानगी 2017 पासून कृषी विभागाला दिली गेली होती. रेशन दुकानदारांनी बियाणे विक्री करायची की नाही हाच मुद्दा आमच्या कक्षेत होता. राज्य शासनाने मान्यता देताच कृषी विभागाला त्याबाबत प्रणाली तयार करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र, कृषी विभागाने स्वतःहून आमच्याकडे संपर्क न साधल्यामुळे हा निर्णय फक्त कागदावर राहिला, अशी माहिती पुरवठा विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, रेशन दुकानातून बियाणे विकण्यास तीन वर्षांपूर्वीच मान्यता दिली गेली आहे. परंतु, कृषी विभाग व पुरवठा विभागाने एकत्रितपणे काहीही प्रणाली तयार केली नाही.
दुकानदारांना मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण देणे, परवाने वाटप करणे असे कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे परत परत त्याच्या घोषणा होतात. मात्र, शेतकऱ्यांना सेवा मिळत नाही. कृषी विभागाने राज्यभर कॅम्प भरवून रेशन दुकानदारांकडून हवी ती कागदपत्रे तसेच परवाना शुल्क भरून घ्यावे व परवाने आमच्याकडे पोहोच करावे. शेतकऱ्यांना आम्ही सेवा देण्यास तयार आहोत. मात्र, परवान्यांच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्यास रेशन दुकानदार सहन करणार नाहीत, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
बियाणे विक्रेत्यांनी काय करायचे?
रेशन दुकानांमधून बियाणे विकले जाणार असल्यास राज्यातील अधिकृत बियाणे दुकानदारांनी काय करायचे, असा सवाल ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डिलर असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी उपस्थित केला आहे. बियाणे विक्रेत्यांना या व्यवसायातील सखोल माहिती असते. ते एकाच छताखाली सर्व उत्पादने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. रेशन दुकानदार या व्यवसायात आल्यास बेरोजगारी वाढेल आणि मग आम्हाला रेशन दुकाने चालविण्याची वेळ येईल, असेही कलंत्री यांनी नमूद केले आहे.





